एखादी सौंदर्यकृती समजण्यासाठी जर तिचे विश्लेषण करावे लागत असेल, इतर कुणी त्यावर भाष्य करण्याची गरज असेल तर तिचा उद्देश सफल झाला का, असा मला प्रश्न पडतो.” चार्ली चॅप्लिन.

“एखादी सौंदर्यकृती समजण्यासाठी जर तिचे विश्लेषण करावे लागत असेल, इतर कुणी त्यावर भाष्य करण्याची गरज असेल तर तिचा उद्देश सफल झाला का, असा मला प्रश्न पडतो.” चार्ली चॅप्लिन.

‘सिटीलाइट्स’ या चार्ली चॅप्लिनच्या असामान्य चित्रपटावर काही लिहिण्यापूर्वी मला त्यानेच काढलेले वरील उदगार आठवले आणि मी थबकलो. श्रेष्ठ कलाकृतीला भाष्याची गरज असते हे तर खरेच. पण शेवटी त्यांच्यासंबंधी लिहिणेही आवश्यक असते. या लिखाणाचा एक उद्देश त्या कलाकृतीने आपल्याला दिलेल्या आनंदाचे ऋण फेडणे हा असतो. तो आनंद इतरांपर्यंत पोचवायला हवा ही ओढ यामागे असते. दुसरे म्हणजे कलाकृतीवरचा लेख म्हणजे नेहमी तिच्यावरील भाष्यच असेल असे नव्हे. स्वतःलाच अधिक समजून घेण्याचाही तो प्रयत्न असतो. सिटीलाइट्स’ हा चित्रपट १९३१ या वर्षी प्रकाशित झाला. मात्र त्यापूर्वी जवळजवळ तीन वर्षे त्याची निर्मिती चालू होती.

या काळात चित्रपटसृष्टीत एक मोठी क्रांती येऊ घातली होती, ती होती आवाजाची क्रांती. सिनेमाला ‘आवाज’ मिळाला होता. या घटनेचे फार दुरगामी परिणाम चित्रपट व्यवसायावर झाले. प्रेक्षकांना या तंत्राचे आकर्षण वाटणे स्वाभाविक होते. त्यामुळे यानतर लोक मूकपट पाहतील की नाही या भीतीने निर्मात्यांनी मूकपट काढणे बंद केले. याचा फटका लिहिता वाचता न येणाऱ्या अनेक कलाकारांना जास्त बसला. कारण बोलपटासाठी शुद्ध, स्वच्छ उच्चार हा एक आवश्यक गुण बनला. त्यामुळे दुसरी एक गोष्ट अशी झाली की नाटकातली नटमंडळी मोठ्या संख्येने चित्रपटात शिरली. चित्रपट शब्दबंबाळ बनण्याची सुरुवात लगेच झाली. बोलता येऊ लागले की पात्रे बोलतच सुटली. आपल्याकडेही याच पद्धतीने चित्रपटाचा विकास झाला. आजही बहुसंख्य चित्रपट हे बोल’पटच असतात. मौनाची भाषा लोक विसरूनच गेले आहेत.

मात्र चार्ली चॅप्लिनने या बदलाचा इतक्या तडकाफडकी स्वीकार करण्याचे नाकारले. त्याने हट्टाने ‘सिटीलाइट्स मूकच ठेवला. फक्त काही ठिकाणी त्याने ध्वनीचा उपयोग केला. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी प्रथमच त्याने पार्श्वसंगीतही तयार केले. चॅप्लिनची भूमिका अशी होती की, जर त्याचा ट्रॅम्प इंग्रजी बोलू लागला तर तो एका भाषेच्या बंधनात अडकेल. इंग्रजी न जाणणाऱ्या माणसाला तो परका वाट लागेल. चेहऱ्याची भाषा ही वैश्विक भाषा आहे, हे जाणून चॅप्लिनने हा निर्णय घेतला होता, व तो किती योग्य होता हे चित्रपट प्रकाशित झाल्यावर सिद्ध झाले.

लोक बोलपटाकडे वळले म्हणून आपणही वळावे हे चॅप्लिनला मान्य नव्हते. लोकाना हसविणे हे त्याचे ध्येय्य होते हे खरे, पण तो लोकांचा खुशमस्कऱ्या नव्हता. पब्लिकला जे हवे ते आम्ही देतो असे काही निर्माते-दिग्दर्शक सतत म्हणत आले आहेत. (आपल्याकडेही ही भूमिका घेणारे, दिग्दर्शक होते व अजुन आहेत) या बाबतीत चॅप्लिनचे मत वेगळे होते. त्याने म्हटले आहे-‘आपल्याला काय हवे हे पब्लिकला माहीत असते यावर माझा विश्वास नाही.’ ही भूमिका एकदा घेतली की, लोकांना दिशा दाखविण्याची कलावंतावरची जबाबदारी वाढते. ही जबाबदारी घेण्यास चॅप्लिन नेहमीच तयार होता. यासाठी तो प्रचंड कष्ट घेई. अनेकदा एकेका दृश्याचे पन्नास पन्नास टेक घेतानाही तो थकत नसे. त्याने या सिनेमासाठी तीन लाख चौदा हजार फूट लांबीची फिल्म शूट केली होती. त्यातून कोरून काढून त्याने केवळ आठ हजार फुटांचे असामान्य चित्रशिल्प तयार केले.